SÛleÛjpÙele

Tuesday, August 31, 2010

क्रिकेट: सट्टेबाजांचा खेळ

पाक क्रिकेट संघातील अनेक खेळाडू 'मॅच फिक्सिंग'मध्ये अडकल्यानं चर्चेला उत आला आहे. 'जटलमन्स गेम' मानल्या जाणाऱ्या क्रिकेटवर ही नामुष्कीची वेळ आली आहे, असं मत माडलं जात आहे. 'आयसीसी'नं आता काही कठोर पावलं टाकायला हवीत, असं सुचवलं जात आहे.
हा जो सगळा चर्चेचा सूर आहे, तो बघितला की, आपल्या देशातील माध्यमं, त्यात चर्चा करणारे तज्ज्ञ आणि इतर क्रिकेटप्रेमी यांच्या भाबडेपणाबद्दल हसावं की, अशा काही कारवाईनं क्रिेकट पुन्हा एकदा 'जंटलमन्स गेम' बनेल या आशावादाबद्दल त्यांची कीव करावी, असा प्रश्न पडतो.
आज पाक क्रिकेट संघावरून गदारोळ उडाला असताना बॉब वुल्मर याची कोणाला कशी आठवण होत नाही? गेल्या विश्वचषक सामन्यांच्या वेळी वेस्ट इंडिजमध्ये वुल्मरचा अकस्मात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचं कारण आजही उलगडलेलं नाही. वुल्मर हा पाक संघाचा प्रशिक्षक होता. वुल्मरच्या मूत्यूनंतर सुरूवातीस वेस्ट इंडिजमधील सरकारी अधिकाऱ्यांनी त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. तेथील स्थानिक मॅजिस्ट्रेटनं शवचिकत्सा अहवालाच्या आधारे संशयास्पद मृत्यू अशी नोंदही केली हाती. हॉटेलातील 'सीसी टीव्ही' कॅमेऱ्याच्या आधारे केलेल्या तपासणीत मृत्यूच्या आधी वुल्मरची भेट क्रिकेट क्षेत्राबाहेरच्या व्यक्तींशी भेट झाल्याचं दिसत होतं. मात्र नंतर वुल्मरचं ह्रदयविकारानं मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि मॅजिस्टे्रटचा निष्कर्ष बाद ठरवण्यात आला.
वुल्मरचा मृत्यू 'मॅच फिक्सिंग'च्या प्रकरणामुळंच झाला, अशी उघड चर्चा त्यावेळी सुरू होती. पण विश्वचषकाला गालबोट लागू नये, म्हणून 'आयसीसी'नंच हे सगळं प्रकरणं दडपून टाकलं, असंही मानलं गेलं.
आज आता पाक संघाचे हे सगळे कारनामे उघड झाल्यावर गेल्या 80 सामन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्यचं सांगितलं जात आहे. मग बॉब वुल्मरच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करायला काय हरकत आहे. पण तसं होणार नाही; कारण 'आयसीसी'पासून कोणालाच खऱ्या अर्थानं हे प्रकार थांबवण्यात रस नाही. क्रिकेट हा 'जंटलमन्स गेम' आहे, म्हणून नुसत्या गप्पा मारत राहयचं, पण हा आता पैशचा खेळ आहे. भारतीय उपखंडातील देशातच या खेळाचं वेड आहे आणि त्याचा फायदा घेऊन पैशाची खाण खोदली जात आहे. केवळ पाक खेळाडूंना झोडपून काय उपयोग? हेच पाक खेळाडू 'आयपीएल' सामन्यांत खेळले नाहीत, म्हणून पाकिस्तानच्या प्रेमाचं भरतं आलेल्या अनेकांनी किती ओरडा केला होता? आज त्यांची तोंड बंद आहेत. वसीम अक्रम हा अशा प्रकारात 1998 सालीच गुंतलेला आढळून आला होता. पण आजही तो एका आयपीएल संघाचा प्रशिक्षक आहे आणि कॉमेन्टरीही करीत असतो.
किंबहुना 'आयपीएल' हा एक मोठा सट्टा आहे आणि त्यात भारतीय क्रिेकट नियामक मंडळ, आयसीसी आणि भारतीय व इतर देशातील खेळाडू सामील आहेंत. जनतेच्या क्रिेकटच्या वेडाचा फायदा घेऊन हे सारं जण अब्जावधींच माया कमावत आहेत.
म्हणूनच क्रिकेट हा आता 'जंटलमन्स गेम' राहिलेलाच नाही. घोडयाच्या शर्यतीसारखा तो पैसे मिळवण्याचा सट्टा बनला आहे.
पाक संघाच्या 'मॅच फिक्सिंग'मधील सहभागानं हेच पुन्हा एकदा सिध्द केलं आहे.

No comments:

Post a Comment