SÛleÛjpÙele

Sunday, April 25, 2010

आयपीएलमागचं राजकारण

आयपीएलच्या वादाच्या भोव-यात शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल सापडले असताना आणि गेला आठवडाभर संसदेत त्यावरून गदारोळ उडत असताना अचानक फोन टॅपिंगचं प्रकरण उघडकीस आलं. पवारांसह विरोधी पक्षांचे इतर नेते आणि काँग्रेस नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचाही फोन टॅप केला जात असल्याचं प्रसिद्ध झालं आहे. आता उद्या सोमवारी २६ एप्रिलला सकाळी संसदेत याच प्रश्नावरून हंगामा होणार एवढं निश्चित. मग प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी मागं पडणार.
पवारांनी ४८ तासांत हा असा गेम फिरवला.
पवारांनी टाकलेला हा डाव म्हणजे आयपीएलमागच्या राजकारणातील आणखी एक खेळी आहे.
या आयपीएलमागच्या राजकारणानं जसे काँग्रेसमधील अनेक अंतर्विरोध उघड होत आहेत, तसंच मीडियालाही कसं या वादातील दोन्ही बाजू वापरून घेत आहेत, तेही दिसून येत आहे.
या फोन टॅपिंगच्या प्रकरणात दिग्विजय सिंह यांचं नाव आलं आहे, ते लक्षणीय आहे. त्यांनीच काही दिवसापूर्वी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या नक्षलवादविरोधी धोरणावर टीका करणारा लेख लिहिला होता. फोन टॅपिंगचं प्रकरण गृहमंत्र्यांच्य अखत्यारीत येतं. या प्रकरणामुळं चिदंबरम अडचणीत येणार आहेत. दुसरीकडं याच चिदंबरम यांच्या हाती या आयपीएल प्रकरणाच्या चौकशीची सूत्रं पंतप्रधान सोपवणार आहेत, अशी बातमीही प्रसिद्ध झाली आहे. दिल्लीतील राजकीय वर्तुळाचा कानोसा घेतला, तर कुजबुज ऐकायला मिळते, ती अशी-- याच चिदंबरम यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत जो उमेदवार उभा होता, त्याला पवारांनी मदत केली होती. या उमेदवाराला मॅनेज करण्यासाठी चिदंबरम यांनी मोठी रक्कम खर्च केली. ती खनिजांच्या व्यवहारात असलेल्या कंपनीनं पुरवली होती. ही कंपनी जेथे व्यवहार करू पाहत आहे, तेथेच नक्षलवाद्यांचं प्राबल्य आहे. या व्यवहारातील ही मोठी रक्कम त्या कंपनीनं परदेशातून चिदंबरम यांच्या मुलाच्या कंनीमार्फत आणली. त्याचा सुगावा संबंधित सरकारी विभागांना लागला आहे. आता प्रणव मुखर्जी अर्थमंत्री आहेत. त्यांनी ते प्रकरण आपल्या हाती ठेवलं आहे. याच मुखर्जी यांच्या खात्यातर्फे आयपीएलची चौकशी होत आहे. पण आता त्याची सूत्रं पंतप्रधानांना चिदंबरम यांच्या हाती द्यायची आहेत. या सगळ्याचा संदर्भ पंतप्रधानांच्या प्रकृतीशी आहे. त्यांच्यावर जी ह्रदय शस्त्रक्रिया झाली होती, ती फारशी यशस्वी झालेली नाही. त्यामुळं कदाचित पुढील निवडणुकीच्या आधीच त्यांना प्रकृतीपायी आपलं पद सोडून द्यावं लागेल. पण राहूल यांना निवडणुकीच्या आधी हे पद हाती घ्यायची इच्छा नाही. मग दोन अडीच वर्षासाठी पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न आहे. पंतप्रधानांचा कल चिदंबरम यांच्याकडं आहे. थरूर प्रकरणात त्यांना माघार घ्यावी लागली होती. मुख्रर्जी व अँटनी या दोघा मंत्र्यानी थरूर यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. पण दिल्लीत परतल्यावरही पंतप्रधान म्हणत होते की, राजकारणात असे चढउतार होतच असतात. त्यावरून त्यांचा कल स्पष्ट दिसत होता. पण सोनिया गांधी ठाम राहिल्या. चिदंबरम यांच्यकडं आयपीएलच्या चौकशीची सूत्रं देण्याची खेळी करून पंतप्रधान आपली नाराजी दाखवून देऊ पाहात आहेत. चिदंबरम यांचं महत्व वाढणं आणि जर पंतप्रधानांना पद सोडायची वेळ आल्यास त्यांनी आपलं घोडं पुढं रेटणं सोनिया यांना नको आहे. दिग्विजय सिंह यांनी चिदंबरम यांच्या विरोधात लेख लिहिण्याचा याच्याशी संबंध आहे. फोन टॅपिंगचं प्रकरण उघड झाल्यवर दिग्विजय सिंह यानी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या राज्यात असं काही होईल, यावर माझा विश्वास नाही, पण या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, असं दिग्विजय सिंह यांचं विधान फारसं काही न म्हणता बरंच काही सांगून जातं.
आता राहिला मुद्दा मिडीयाचा.
आयपीएलगेट वा थरूरगेव असं मीडिया या प्रकरणाला वॉटरगेटच्या धर्तीवर म्हणत आहे. पण येथेच हे साम्या संपतं. वॉटरगेव प्रकरणात बॉब वुडवर्ड आमि कार्ल बर्नस्टिन यांना `डीप थ्रोट ' हा त्यांचा `सोर्स' फक्त काही गोष्टी निर्देशित करीत होता. त्याच्या आधारे बाकी सगळं प्रकरण या दोघा पत्रकारांनी खणून काढलं. मुळात वॉटरगेट हॉटेलात डेमॉक्रॅटिक पक्षाच्या कचेरीत चोरी झाल्याचं कळल्यावर यात काही काळंबेरं आहे, याचा संशय येऊन या दोघांनी यात लक्ष घालण्यास सुरूवात केली होती. त्याच्या बातम्या बघूनच एफबीआयचा उपसंचालक असलेला अधिकारी त्यांना काही गोष्टी सूचित करू लागला.
उलट आयपीएल प्रकरणात सर्व तपशील या वादातील दोन्ही बाजू मीडियाच्या हाती आणून देत आहेत. मीडिया स्वत: काही खणून काढतो आहे, असं काही दिसत नाही. दोन्ही बाजू मीडियाला वापरून घेत आहेत आणि एक्सक्लुजिव्ह न्यूजच्या मागं लागलेला मीडिया हे तपशील वापरून बातम्या देत आहे. थरूर प्रकरण गाजत होतं, तेव्हा त्यांच्या विरोधात मोदी गट व काँग्रेसमधाल त्यांचे विरोधक तपशील पुरवत होते. थरूर यांनी राजीनामा दिल्यवर सरकारनं आपला रोख मोदी यांच्याकडं वळवला. मग सरकारी गोटातून मोदी व आयपीएलच्या विरोधात मीडियाला तपशील पुरवला जाऊ लागला. त्याच्या एक्सक्लुजिव्ह बातम्या बनल्या. पुढं प्रफुल्ल पटेल यांच्याकडं काँग्रेसनं मोर्चा वळवल्यावर एअर इंडियाची विमानं कशी आयपीएलसाठी वळवण्यात आली, याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. आता मोदी यांनी धमकी दिली आहे की, आयपीएलचा अंतिम सामना झाल्यवर ते अनेकांचा बुरखा फाडणार आहेत. त्याची सुरूवात काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांच्या बायकोच्या कंपनीत शाहरूख खान यानं आयपीएलचा संघ विकत घेतल्यवर १० कोटी रूपये कसे गुंतवले, त्याचा तपशील प्रसिद्ध होऊन झाली आहे. शाहरूख हा काँग्रेसच्या जवळचा मानला जातो, हे या संदर्भात लक्षात ठेवायला हवं.
खरं तर दोन्ही बाजूनी दिलेला तपशील वापरून नुसत्या बातम्या देण्यापलीकडं या प्रकरणातील सर्व धागेदोरे मीडियानं उघड करून दाखवायला हवे होते. पण तसं काही न करता मीडिया दोन्ही बाजूंनी हाती आणून दिलेला तपशील वापरून नुसत्या बातम्या देण्यातच समाधान मानत राहिला आहे. आपण वापरले जात आहोत, याची जाणीव मीडियातीब बहुसंख्यांना नाही, ही माध्यमांच्या भवितव्याबद्दल चिंता करायला लाणारी बाब आहे.